जळगाव समाचार | ५ मे २०२६
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. मंगळवार, ५ मे २०२६ पासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in वरून ऑनलाइन अर्ज सादर करता येत आहेत. मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलेले, तसेच कमी गुणांमुळे श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ दरम्यान झालेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा अपेक्षेपेक्षा कमी निकाल लागल्याचे मंडळाने नमूद केले होते. परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी कडक उपाययोजना केल्यामुळे निकालावर परिणाम झाल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर अनुत्तीर्ण विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत पुन्हा परीक्षा देणारे, खासगी विद्यार्थी तसेच आयटीआय किंवा निवडक विषयांसह परीक्षा देणाऱ्यांना पुरवणी परीक्षेद्वारे पुनर्प्रयत्नाची संधी देण्यात आली आहे.
या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज सादर करण्याची मुदत ५ मे ते १५ मे २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे, तर विलंब शुल्कासह अर्ज १६ मे ते २० मे २०२६ दरम्यान स्वीकारले जाणार आहेत. संबंधित महाविद्यालयांनी अर्ज शुल्क २१ मेपर्यंत जमा करणे अपेक्षित असून, विद्यार्थ्यांच्या अर्जांच्या याद्या विभागीय मंडळाकडे २५ मेपर्यंत सादर कराव्या लागणार आहेत.
मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित व विलंब शुल्काच्या मुदतीत कोणतीही वाढ केली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अतिविलंब शुल्कासंदर्भातील वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले पुनर्परीक्षार्थी.
श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणारे विद्यार्थी.
खासगी विद्यार्थी (१७ नंबरचा फॉर्म भरलेले).
आयटीआय (ITI) किंवा तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी.
महत्त्वाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:
नियमित शुल्कासह अर्ज: ५ मे ते १५ मे २०२६
विलंब शुल्कासह अर्ज: १६ मे ते २० मे २०२६
महाविद्यालयांनी शुल्क जमा करण्याची मुदत: २१ मे पर्यंत
विभागीय मंडळाकडे याद्या सादर करणे: २५ मे पर्यंत

![]()




