बारावीचा निकाल जाहीर; कोकण अव्वल, मुलींची पुन्हा बाजी

 

जळगाव समाचार | २ मे २०२६

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज, २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल अधिकृतरीत्या जाहीर केला जाणार आहे. राज्यभरातून एकूण १४ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसून त्यापैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. हा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे २.९ टक्क्यांनी घसरलेला आहे. निकालासोबत विद्यार्थ्यांना तात्पुरती गुणपत्रिका तसेच ई-मार्कशीट ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करताना यंदाही कोकण विभागाने सर्वाधिक ९४.१४ टक्के निकालासह अव्वल स्थान पटकावल्याचे सांगितले, तर लातूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ८४.१४ टक्के नोंदवला गेला. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९३.१५ टक्के आहे, तर मुलांची ८६.८० टक्के आहे. त्यामुळे मुली मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी आघाडीवर राहिल्या आहेत.

यंदा बारावीच्या परीक्षेसाठी एकूण १५३ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती मंडळाने दिली. शाखानिहाय पाहता विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९६.४४ टक्के, वाणिज्य शाखेचा ८७.०४ टक्के, कला शाखेचा ७८.०२ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रमाचा ८२.७४ टक्के आणि आयटीआयचा ८१.७८ टक्के निकाल लागला आहे.

फॉर्म क्रमांक १७ अंतर्गत ३६,९४१ खासगी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २९,६३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची उत्तीर्ण टक्केवारी ८०.२१ इतकी आहे. तसेच पुनर्परीक्षा देणाऱ्या ५०,३४६ विद्यार्थ्यांपैकी १८,३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ३६.४४ इतकी नोंदवली गेली आहे.

परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने कठोर उपाययोजना केल्या होत्या. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही अनिवार्य करण्यात आले होते. मात्र १७२ केंद्रांवर सुविधा नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली होती. तसेच २७१ भरारी पथके, पोलिस बंदोबस्त आणि बैठी पथके यांची नियुक्ती करून परीक्षा सुरळीत पार पाडण्यात आली.

विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल आणि गुणपत्रिका mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या संकेतस्थळांवरून रोल नंबर व आईचे पहिले नाव टाकून पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांनी निकालाबाबत कोणताही ताण न घेता तो स्वीकारावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, योजना संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे तसेच कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here