जळगाव समाचार | ११ फेब्रुवारी २०२६
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या लेखी परीक्षेला मंगळवारपासून नाशिक विभागात प्रारंभ झाला. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या चार जिल्ह्यांतील एकूण २८५ परीक्षा केंद्रांवर एक लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. सकाळी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थी व पालकांनी केंद्रांवर गर्दी केली होती. दहावीचा अनुभव असला तरी बारावीच्या परीक्षेचे शैक्षणिक महत्त्व लक्षात घेता विद्यार्थ्यांसह पालकांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट जाणवत होता. परीक्षा केंद्रांवर वेळेआधी पोहोचण्यासाठी मोठी लगबग दिसून आली.
कॉपीमुक्त अभियान राबविण्याचा निर्धार शिक्षण विभागाने यंदा अधिक कडक उपाययोजनांद्वारे केला आहे. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने संवेदनशील, अतिसंवेदनशील व उपद्रवी केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परीक्षा केंद्रांच्या बाहेर चित्रीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून केंद्रांच्या आत बैठे पथके तसेच नऊ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षता समितीची पथके कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक तपासण्या करीत आहेत. केंद्र परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध नाही ती केंद्रे पुढील वर्षापासून बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नाशिक विभागातील २८५ पैकी २६२ केंद्रांवर सीसीटीव्ही व्यवस्था कार्यरत आहे.
कठोर उपाययोजनांनंतरही परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील परीक्षा केंद्रावर चार विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मात्र नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत एकही कॉपीप्रकरण नोंदवले गेले नाही. परीक्षा सुरू होण्याच्या व संपल्यानंतरच्या वेळेत अनेक केंद्रांबाहेर विद्यार्थी व पालकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. दुपारच्या सत्रातील शाळा व महाविद्यालयांच्या वेळेमुळे या कोंडीत अधिक भर पडली. शिक्षण, महसूल व जिल्हा परिषद संलग्न विभाग कॉपीमुक्त परीक्षेसाठी संयुक्तरीत्या प्रयत्न करीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

![]()




