जळगाव समाचार | ७ नोव्हेंबर २०२५
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक अमजद खान असलम खान यांना सेवेतील हलगर्जीपणा व कार्यातील अनास्था दाखवल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी तत्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले. वैद्यकीय देयकांच्या प्रक्रियेत नियमबाह्य पद्धतीने काम केल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर कर्मचारी वैद्यकीय देयकांचे कार्यासन सांभाळताना विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनंतरही संबंधित देयकावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचा आवश्यक अभिप्राय न घेता थेट मुख्य कार्यकारी अधिकारींकडे मान्यतेसाठी पाठविले. याशिवाय, कार्याशी संबंधित काही कामकाज वेळेत न पूर्ण करणे व अपूर्ण ठेवणे असे गंभीर निष्काळजीपणाचे प्रकार त्यांच्या कामकाजात आढळून आले.
या प्रकरणात प्रशासकीय प्रक्रियांचा भंग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिस्तभंगाच्या कारवाईचा भाग म्हणून खान यांना निलंबित करण्यात आले. “जिल्हा परिषदेच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अनिवार्य असून कोणत्याही प्रकारचा नियमभंग सहन केला जाणार नाही,” असे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिले आहेत.

![]()




