जळगाव समाचार | ७ नोव्हेंबर २०२५
दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अखेर जिल्ह्यातील १३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने तांत्रिक व किचकट प्रक्रिया पूर्ण करत हा निर्णय अंमलात आणला. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेला विषय मार्गी लागला.
या प्रक्रियेत प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अजय चौधरी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पी. आर. चौधरी आणि ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रस्तावांची तपासणी, पडताळणी आणि मंजुरीची साखळी पद्धतशीर पार पाडत पात्र अधिकाऱ्यांना लाभ वितरीत करण्यात आला. काटेकोर नियोजन आणि संघभावनेमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अखेर त्यांचा वैध हक्क मिळाला.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले की, शासनाच्या योजना वेळेत आणि अचूकपणे राबवणे हे प्रशासनाचे प्राधान्य आहे. आश्वासित प्रगतीचा लाभ मिळाल्याने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा उत्साह वाढेल आणि सेवाभावी कार्याला नवे बळ मिळेल. या निर्णयामुळे अधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत.

![]()




