सर्जनशील अध्ययन साहित्यामुळे शिक्षकांच्या नाविन्यपूर्णतेला व्यासपीठ – सीईओ मिनल करनवाल यांचे प्रतिपादन : विजेत्या शिक्षकांचा गौरव

जळगाव समाचार | ३० सप्टेंबर २०२५

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून निपुण भारत अभियानांतर्गत सर्जनशील अध्ययन साहित्य निर्मिती स्पर्धा – 3 उत्साहात पार पडली. शालेय शिक्षण अधिक परिणामकारक, आकर्षक आणि आनंददायी करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन महिला अध्यापिका विद्यालयात सीईओ मिनल करनवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे, शिक्षणाधिकारी सचिन परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत चार्ट्स, मॉडेल्स, फ्लॅशकार्ड्स, खेळांद्वारे शिकवणी साधने तसेच मल्टिमीडिया सादरीकरण अशा विविध पद्धतींनी अभ्यासक्रमाशी संबंधित साहित्य सादर करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व शिक्षकांच्या नाविन्यपूर्णतेला योग्य व्यासपीठ मिळाले, असे समाधान व्यक्त करण्यात आले. डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी या स्पर्धेत निवडलेले उत्कृष्ट साहित्य जिल्हास्तरावरील तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती दिली. यामुळे शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याधिष्ठित होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी विद्यार्थ्यांनी पाठांतराऐवजी समजून घेऊन शिकण्यावर भर द्यावा, असे सांगत शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून तयार केलेले अध्ययन साहित्य निपुण भारत मोहिमेला गती देणारे ठरेल, असे प्रतिपादन केले. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील 38 शिक्षकांनी सहभाग नोंदविला. परीक्षकांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन साहित्याचे परीक्षण केले.

निकाल जाहीर करताना सुनील बडगुजर यांनी प्रथम क्रमांक, सीमा पाटील यांनी द्वितीय क्रमांक, तर अश्विनी तायडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पुरस्कार छाया पाटील, विनोद नाईकडा आणि फौजिया खान यांना देण्यात आला. परीक्षक म्हणून डॉ. जगन्नाथ दरंदले, प्रणिता झांबरे आणि लीना महाजन यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी मानले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांसाठी परिणामकारक अध्ययनाची नवी दारे खुली झाली असून शिक्षकांच्या सर्जनशीलतेला प्रेरणा मिळाल्याचे मान्यवरांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here