जळगाव समाचार | ६ जानेवारी २०२६
राज्यात सध्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून येत्या १५ जानेवारी रोजी मतदान व १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होताच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तयारी वेग घेणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार, महापालिका निवडणुका पार पडताच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, याच आठवड्यात याबाबत निर्णय होऊ शकतो.
राज्य निवडणूक आयोगाकडून ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. आयोगाच्या प्राथमिक तयारीनुसार, पुढील महिन्यात म्हणजेच ७ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याचा विचार सुरू आहे.
दरम्यान, आरक्षणाच्या पेचामुळे निवडणूक प्रक्रियेला विलंब होत आहे. राज्यातील १७ जिल्हा परिषदांमध्ये आणि ८८ पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेत बसणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच निवडणुका घेण्यात येणार असून, त्या अनुषंगाने आवश्यक तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू आहे.
महापालिका निवडणुकांमध्ये सध्या जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा पूर्णतः व्यस्त आहे. काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे आदेश दिले असले, तरी आरक्षणाच्या अडचणींमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वेळापत्रक लांबले आहे. मात्र, ही प्रक्रिया लवकरच मार्गी लागून ७ फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

![]()




