जळगाव समाचार डेस्क | २८ सप्टेंबर २०२४
शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या पुढाकाराने आयोजित अस्सल लेवा गणबोली भाषेतील नाट्यकलाकृती ‘झेंडूचं फुल’ या नाटकाला जळगावकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सलग दोन दिवस छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये नागरिकांनी हाऊसफुल्ल उपस्थिती नोंदवली.
स्नेहयात्री प्रतिष्ठान निर्मित आणि वीरेंद्र पाटील लिखित व दिग्दर्शित ‘झेंडूचं फुल’ या नाटकाने शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रभावी भाष्य केले. राज्य शासनासह विविध पुरस्कारांनी गौरविल्या गेलेल्या या नाटकात ७ कलाकारांनी शेतकऱ्यांच्या संघर्षमय जीवनाचे चित्रण सादर केले. नाटकाद्वारे शेतकरी कसा कष्ट करत समाज आणि देशासाठी मोठे योगदान देतो हे गंभीरपणे दाखविण्यात आले.
नाटकाच्या प्रारंभी कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे, माजी महापौर सीमा भोळे, माजी नगरसेविका रंजना वानखेडे, गायत्री राणे, राजू मराठे, विजय वानखेडे आणि दीप्ती चिरमाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
खा. स्मिता वाघ यांनी मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या कष्टाचे ऋण समाजाने फेडले पाहिजे, असे सांगून कलाकारांना शुभेच्छा दिल्या. तर आ. राजूमामा भोळे यांनी युवकांनी शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. काही भागात शेती ओस पडण्याची स्थिती असून, आधुनिक शेतीतून चांगले उत्पन्न मिळवता येते. शेतकरी राजा हा देशाचा पोशिंदा आहे, त्याला जगवणे हे समाजाचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. दोन्ही दिवस नाटक पाहण्यासाठी सभागृह पूर्णत: भरले होते.