जळगाव समाचार डेस्क | २८ नोव्हेंबर २०२४
जिल्ह्यातील युवक व युवतींच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन २ डिसेंबर २०२४ रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले आहे.
युवा महोत्सवाचा उद्देश युवकांच्या अंगभूत सुप्तगुणांना वाव देणे, परंपरा आणि संस्कृती जतन करणे, तसेच युवकांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. या महोत्सवात विविध कलाप्रकारांतील स्पर्धा आणि विज्ञान व तंत्रज्ञान आधारित कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
युवा महोत्सवात लोकगीत, लोकनृत्य, कौशल्य विकास स्पर्धा, कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, कविता लेखन, हस्तकला, वस्त्रोद्योग, अॅग्रो प्रॉडक्ट, मोबाईल फोटोग्राफी यांसारख्या विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. याशिवाय, जळगाव युथ आयकॉन पुरस्कार देण्यात येणार आहे, ज्यामध्ये समाज, शिक्षण, आरोग्य, आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या युवक-युवतींना सन्मानित केले जाईल.
स्पर्धेमध्ये १५ ते २९ वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत प्राविण्य प्राप्त स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि शासनाच्यावतीने विविध पारितोषिके दिली जातील. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांची विभागीय स्तरावर निवड होईल, तर विभागीय स्तरावरील विजेत्यांची राज्य आणि राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड केली जाईल.
युवा महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी किंवा संस्थांनी प्रवेश अर्ज २८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत जमा करावेत. विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी ९८२३७७३७९७ किंवा ८६२५९४६७०९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.