कुटुंबासमोरच ममुराबादच्या तरुणाचा विसर्जनादरम्यान बुडून मृत्यू

 

जळगाव समाचार | ७ सप्टेंबर २०२५

जळगाव जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायला मिळत असताना ममुराबाद येथील एका तरुणाच्या जीवावर बेतले. गणेश गंगाराम कोळी (वय २७, रा. ममुराबाद, ता. जळगाव) हा आपल्या आई-वडिलांसह आणि बहिणीसोबत पाळधी-तरसोद दरम्यान नव्याने उभारलेल्या गिरणा नदीवरील पुलाखाली घरगुती गणेश विसर्जनासाठी गेला होता. सायंकाळी सुमारे सहा वाजता मूर्ती विसर्जनासाठी नदीत उतरल्यावर त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. कुटुंबियांनी आरडाओरड करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने त्याला वाचवता आले नाही.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्र मदतीसाठी धावून आले, तसेच तालुका पोलिसांनाही कळविण्यात आले. नागरिकांच्या सहकार्याने पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला; तरीही गणेशचा काही पत्ता लागला नाही. गिरणा धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने शोध कार्यात अनेक अडथळे आले. रविवारी सकाळपासून पुन्हा शोध सुरू करण्यात आला असून आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी आणि कानळदा गावाजवळ नदीकाठावर त्याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाने पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे उघडले असून सुमारे ९७६८ क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

गिरणा नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून, धरणात ९६ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, परिस्थिती हाताळण्यासाठी शासकीय यंत्रणांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. चाळीसगाव येथील पाटबंधारे विभागाच्या उप अभियंत्यांनीही परिस्थिती गंभीर असल्याचे सांगून नागरिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळण्याचे आवर्जून सांगितले. गणेशच्या अकाली जाण्याने ममुराबाद गावावर शोककळा पसरली असून, कुटुंबीयांसह संपूर्ण गाव दुःखात बुडाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here