Monday, December 23, 2024
Homeराजकारणलाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीत तणाव – मंत्रिमंडळ बैठकीत वाक्‌युद्ध

लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीत तणाव – मंत्रिमंडळ बैठकीत वाक्‌युद्ध

जळगाव समाचार डेक| ६ सप्टेंबर २०२४

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीत तणाव वाढला असून, याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत वाद झाल्याचे समजते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या योजनेचे संपूर्ण श्रेय मिळत असल्याचा आरोप अन्य पक्षातील मंत्र्यांनी केला आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, योजनेवरून तिन्ही पक्षांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे.

बैठकीत काही मंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर लाडकी बहीण योजनेचे श्रेय एकटेच घेत असल्याचा आरोप केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत, लवकरच या योजनेच्या अनुषंगाने एसओपी जाहीर करू असे सांगून वातावरण शांत केले. मात्र, या श्रेयवादामुळे महायुतीतील वाद उफाळल्याचे दिसत आहे.

लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून अजित पवार यांच्या जनसमान यात्रेदरम्यान या योजनेचा जोरदार प्रचार होत आहे. बॅनर, पोस्टर, आणि जाहिरातींमध्ये अजित पवार यांचेच नाव आणि फोटो दिसत असल्याने भाजप आणि शिवसेनेतील काही मंत्री नाराज आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाव योजनेच्या प्रचारात न आल्याने तणाव वाढला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते उमेश पाटील यांनी स्पष्ट केले की, अजित पवार यांची जनसमान यात्रा हा पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या जाहिरातींवर केवळ अजित पवार यांचेच फोटो असणे स्वाभाविक आहे. त्यांनी असेही सांगितले की, मुख्यमंत्री किंवा इतर पक्षांनी आक्षेप घेण्याचे कारण नाही. योजनेच्या घोषणा झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या होर्डिंग्ज संपूर्ण महाराष्ट्रात दिसत होत्या, तेव्हा अजित पवारांनी काहीही आक्षेप घेतला नव्हता, असेही त्यांनी नमूद केले.

या श्रेयवादामुळे महायुतीत तणावाचे वातावरण तयार झाले असून, अजित पवारांच्या वाढत्या प्रभावामुळे भाजप आणि शिवसेना पक्षांमध्ये नाराजी आहे. मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या वादामुळे या तणावाचा उलगडा झाला आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page