जळगाव समाचार डेस्क| १० ऑक्टोबर २०२४
राज्यभरात सध्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरू आहे. ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढल्यानंतर, दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने येत्या दोन दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे. तसेच नगर, पुणे, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, पालघर, ठाणे, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
काल (ता. ९) दुपारपासून पुण्यासह राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आज (ता. १०) देखील अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परतीचा पाऊस राज्यातील गहू आणि हरभरा पिकांसाठी वरदान ठरणार आहे. रब्बी हंगामात या पिकांचे उत्पादन घेतले जाते आणि हा पाऊस त्यांना फायदा देईल, असे कृषी तज्ञांचे म्हणणे आहे.