जळगाव समाचार | ३० ऑगस्ट २०२५
यावल तालुक्यातील विरावली–दहिगाव रस्त्यावर २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी संशयित असलेले दोन युवक स्वतः यावल पोलीस ठाण्यात हजर झाले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मयत तरुणाची ओळख इम्रान युनूस पटेल (वय २१, रा. हनुमंतखेडा, ता. धरणगाव) अशी झाली आहे. इम्रान काही दिवसांपासून आपल्या मामाकडे राहण्यासाठी यावल तालुक्यातील दहिगाव येथे होता. गुरुवारी रात्री विरावली-दहिगाव मार्गावरील खिरवा गावाजवळ त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
हत्यानंतर अल्पावधीतच दोन युवक, ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९) आणि गजानन रवींद्र कोळी (वय १९), यांनी स्वतः मोटारसायकलवरून थेट यावल पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले व गुन्ह्याची कबुली दिली.
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र पोलिसांनी वेळीच नियंत्रण मिळवले. हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचा शोध पोलिस घेत असून यावल पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे.