जळगाव समाचार डेस्क। १६ ऑगस्ट २०२४
बांगलादेशातील हिंदू समुदायावर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदचा मोठा प्रभाव देशभरात जाणवण्याची शक्यता असल्यामुळे यावल तालुक्यातील प्रशासनाने पुढाकार घेत शुक्रवारी होणारा आठवडे बाजार रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
यावल तालुक्यातील नागरिकांसाठी आणि शेतकरी, व्यापारी बांधवांसाठी शुक्रवारी आयोजित होणारा आठवडे बाजार म्हणजे आर्थिक देवाण-घेवाण आणि सामाजिक भेटीगाठींचा एक प्रमुख मंच असतो. मात्र, या आठवड्यातील बंदच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि बंदला प्रतिसाद देण्यासाठी बाजार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावलचे नगरपालिका प्रशासन आणि पोलीस विभाग या निर्णयावर ठाम असून, बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी तातडीने बैठक बोलावून पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. यावल परिसरातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आठवडे बाजाराच्या रद्द होण्याची माहिती पोहोचविण्यासाठी प्रशासनाने विशेष सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी देखील या निर्णयाची दखल घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावल बाजार हा तालुक्यातील एक प्रमुख बाजार असल्याने या निर्णयामुळे अनेक शेतकरी व व्यापाऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. तथापि, याप्रसंगी प्रशासनाचा निर्णय हा शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.

![]()




