जागतिक रंगभूमी दिनी नाट्यगृह कर्मचाऱ्यांचा रंगमंचाला भावपूर्ण मानाचा मुजरा

 

जळगाव समाचार | २७ मार्च २०२६

२७ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जळगाव येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात एक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी उपक्रम पार पडला. या निमित्ताने नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांनी रंगमंचाची विधिवत पूजा करून कलेप्रती आपली निष्ठा, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता साधेपणाने आणि श्रद्धेने साजरा केला.

या उपक्रमात नाट्यगृहातील विद्युत तंत्रज्ञ विजय पाटील, सफाई कर्मचारी गोपाल गवळी आणि सुरक्षारक्षक राजेंद्र काकडे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सकाळच्या वेळेत रंगमंचाची पारंपरिक पद्धतीने पूजा करत कलेला वंदन केले. त्यांच्या या कृतीतून रंगभूमीविषयी असलेली नितांत श्रद्धा आणि कलेबद्दलचा जिव्हाळा प्रकर्षाने दिसून आला. “रंगमंच ही केवळ अभिनयाची जागा नसून ती एक प्रकारचे देवस्थान आहे,” अशी भावना त्यांच्या या उपक्रमातून व्यक्त झाली.

रंगभूमीवर झळकणारा कलाकार हा प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो, मात्र त्या मागे अनेक कर्मचाऱ्यांचे निःशब्द योगदान असते. प्रकाशयोजना, स्वच्छता, सुरक्षा यांसारख्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत हे कर्मचारी रंगमंच सुरळीत चालावा यासाठी सातत्याने कार्यरत असतात. या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांनी स्वतःहून केलेल्या पूजनाने त्यांच्या कार्यामागील समर्पण आणि कलेप्रती असलेली निस्वार्थ भावना अधोरेखित झाली.

सदर उपक्रमाने रंगभूमी ही केवळ कलाकारांची मक्तेदारी नसून तिच्या उभारणीत आणि जतनात योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची असल्याचा संदेश दिला. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून केलेल्या या साध्या पण अर्थपूर्ण कृतीमुळे नाट्यसंस्कृतीप्रती आदर अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here