जळगाव समाचार | २६ मार्च २०२५
शहरातील प्रत्येक घरगुती नळजोडणीवर ऑक्टोबरपासून वॉटर मीटर बसवण्याचे काम सुरू होणार आहे. जळगाव महानगरपालिकेने ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत १८० कोटी रुपयांचा प्रकल्प तयार केला असून, शासनाने त्याला मंजुरी दिली आहे. या योजनेद्वारे शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
९० हजार घरांवर वॉटर मीटर बसवले जाणार
महापालिकेने या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. अंतिम टप्प्यातील छाननीनंतर ऑक्टोबरपासून वॉटर मीटर बसवण्याचे काम सुरू केले जाईल. या अंतर्गत शहरातील ९० हजार घरगुती नळजोडणींवर वॉटर मीटर बसवले जातील. वॉटर मीटर बसवल्यानंतर नागरिकांना त्यांच्या प्रत्यक्ष वापरलेल्या पाण्याचे शुल्क आकारले जाईल. यामुळे पाण्याचा अपव्यय रोखला जाणार असून, प्रत्येक कुटुंबाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळण्यास मदत होणार आहे.
सोलर प्लांट आणि पाइपलाइनचे कामही हाती
या प्रकल्पात फक्त वॉटर मीटर बसवण्याचेच नव्हे, तर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अन्य महत्त्वाच्या बाबींचाही समावेश आहे. बापुर धरणापासून ते फिल्टर प्लांटपर्यंत आठ किलोमीटर लांब पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच, पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या वीजेचा खर्च कमी करण्यासाठी सोलर प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२४ तास पाणीपुरवठ्याचे लक्ष्य
वॉटर मीटर बसवल्यानंतर जळगाव शहरातील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा मिळेल, असा दावा महापालिकेने केला आहे. या योजनेमुळे पाणीपुरवठा व्यवस्थापन अधिक नियोजनबद्ध होईल आणि नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल. यामुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठ्या सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
महापालिकेने नागरिकांना वॉटर मीटर बसवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने आपली नळजोडणी अधिकृत ठेवावी व पाण्याचा वापर जबाबदारीने करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.