जळगाव समाचार डेस्क| २१ ऑक्टोबर २०२४
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर सभेत आपली भूमिका स्पष्ट करताना “साहेबांना सोडलं नाही, साहेब आमच्या मनात आहेत” असं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर विरोधकांनी या वक्तव्यावरून टीकेची संधी साधली आहे. त्याचवेळी, निवडणुका तोंडावर असल्यानेच वळसे पाटील यांनी हे वक्तव्य केल्याचा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
रोहित पवार यांनी सांगितलं की, निवडणूक जवळ आल्यानेच साहेबांची आठवण झाली आहे. वळसे पाटील हे एकेकाळी शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते, मात्र त्यांनीच अजित पवारांची साथ घेतल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. या टीकेनंतर वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यात, “वेळेनुसार निर्णय घ्यावे लागतात,” असे सांगत एक सुचक विधान केले आहे.
शरद पवारांना दैवत मानणारे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, आणि नरहरी झिरवळ यांनीही आपल्या भाषणांमध्ये पवारांचा सन्मान राखला आहे. हे नेते अजित पवारांसोबत असले तरी शरद पवारांवरील आपला आदर व्यक्त करत आहेत, त्यामुळे समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फूटीनंतर अजित पवारांच्या गटातील नेत्यांनी शरद पवारांविषयी थेट टीका करणं टाळलं आहे. याच वेळी, अजित पवार गटातील नेत्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करत पवारांच्या निष्ठावंत समर्थकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. आता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये वळसे पाटलांचे आणि इतर नेत्यांचे शरद पवारांविषयीचे सॉफ्ट कॉर्नर त्यांना फायद्याचा ठरणार की तोट्याचा, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.