Sunday, December 22, 2024
Homeआणखीहे आपणास माहित हवं! 20 जून 1887 बोरीबंदरचे “व्हिक्टोरिया टर्मिनस” असे नामकरण...

हे आपणास माहित हवं! 20 जून 1887 बोरीबंदरचे “व्हिक्टोरिया टर्मिनस” असे नामकरण झाले…

 

सामान्य ज्ञान, जळगाव समाचार डेस्क,

मुंबईतील (Mumbai) C.S.M.T (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) माहिती नाही असा माणूस सापडणे विरळाच आहे. भारतात रेल्वे (Indian Railway) सुरु झाल्यानंतर 165 वर्षांच्या कालावधीत या सी.एस.एम.टी.ने अनेक बदल अनुभवले आहेत, अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. तरी आपल्या दिमाखदार ऐतिहासिक वास्तूसह सी.एस.एम.टी. जागतिक वारसा सांभाळत उभे आहे. ह्या स्टेशनातून देशाच्या कानाकोप-यात गाड्या सुटतात व येथे येतात. मुंबईच्या रोजच्या व्यवहारात ह्या स्टेशनाला खुप महत्व आहे. हे स्टेशन बंद झाले म्हणजे मुंबई बंद झालीच समजा. लगेच सगळे व्यवहार ठप्प होतात.
ज्यावेळेस रेल्वे सुरु झाली त्यावेळेस या स्थानकाचे नाव बोरीबंदर होते. बोरीबंदर ते ठाणे दरम्यान दि. 16 एप्रिल 1853 मध्ये पहिली रेल्वे धावली. त्यानंतर मुख्य स्थानकाचा विस्तार केल्यावर या इमारतीला बॉम्बे पॅसेंजर्स स्टेशन ही ओळख मिळाली. ही ओळख 20 जून 1887 पर्यंत कायम होती. 20 जून 1887 ला याचे नामकरण करण्यात आले ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ नंतर कालांतराने 1995 च्या युती सरकारच्या कालावधीत व्हिक्टोरिया टर्मिनसचे पुन्हा नामांतर झाले ते म्हणजे सध्याचे छत्रपती शिवाजी टर्मिनस (सी.एस.टी.).
एकोणिसाव्या शतकातील शेवटच्या ३० वर्षांमध्ये मुंबईच्या वैभवात निरनिराळ्या नयनरम्य इमारतींची भर पडली. बोरीबंदर हे त्यातील सर्वोत्कृष्ठ वास्तुशिल्प. ह्या इमारतीच्या शिल्परेखानाचे काम एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्सन या वस्तू विशारदाने केले. ही इमारत म्हणजे इटालियन वास्तुकलेचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. हे स्थानक या परिसरात फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स या शिल्पकाराने १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधलं होतं. तेव्हापासून बोरीबंदरची ओळख ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ अशी झाली. याचं बांधकाम १८७८मध्येच सुरू झालं होतं. ही इमारत पूर्ण होण्यासाठी तब्बल दहा वर्ष लागली होती. त्यावेळी ही भव्य वास्तू बांधायला साधारण १६ लाख १४ हजार रुपये इतका खर्च आला होता. टर्मिनसच्या छतावर राणी व्हिक्टोरियाचा पुतळा असून राणी व्हिक्टोरियाच्या राजवटीच्या स्मरणार्थ याचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस असे ठेवण्यात आले होते. संपूर्ण इमारत स्थानिक गॉथिक अलंकरणाने व तपशिलाने सजवलेली असून भारतीय गवंड्यांनी प्रशंसनीय रीतीने ही कामगिरी पार पाडली आहे. प्युगीन, बर्जेस, बटरफील्ड, स्कॉट, स्ट्रीट यासारख्या त्या कालखंडातील महान ब्रिटिश स्थापत्यविशारदांच्या परंपरेत बसणारी ही निर्मिती होती.
सीएसटी म्हटलं तरी अजूनही जुन्या मुंबईकराच्या मनात ‘व्हीटी’ असंच येतं. मान उंचावून वर पाहिलंत तर तुम्हाला व्हिक्टोरिया राणीची प्रतिमा दिसते. इतकंच काय जिथे नजर जाईल तिथे कोरीव काम, कलाकुसर नजरेस पडते. भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर-ठाणे दरम्यान सुरू झाली. दि.१६ एप्रिल, १८५३ रोजी ती वाहतूकीस खुली करण्यात आली व त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. १८७० मध्ये मुंबईला कोलकाता या महानगराशी, तर १८७१ मध्ये चेन्नईशी लोहमार्गाद्वारे जोडण्यात आले. नैसर्गिक बंदर आणि व्यापारी केंद्रासाठी हे स्थानक त्या वेळी महत्त्वाचे मानले जात होते. भारतात इंग्रजांनी आपल्या वाढत जाणार्‍या आर्थिक सुधारणांसाठी येथूनच रेल्वेचा जास्त वापर करण्यास सुरुवात केली. यासाठी इंग्रजांनी बोरीबंदर स्थानक सुधारण्याचा आणि तेथे इमारत बांधण्याचा विचार सुरू केला. इतकी मोठी कलाकुसर असलेल्या वास्तूविषयी कुतूहल वाटलं नाही तरच नवल! बाहेरूनच नव्हे तर आतही कुठेही गेलात तरी कलाकुसरच नजरेस पडते. कोणीही प्रेमात पडावं अशीच कलाकुसर.पूर्वी तर ‘बोरीबंदर’ अशीच व्हीटीची ओळख होती. आजही आपल्या घरातील बुजुर्ग मंडळींच्या तोंडी ‘बोरीबंदर’ असंच नाव असतं. जेव्हा मुंबईवरून मालाची आयात-निर्यात होत होती तेव्हा तिथे मालाच्या बोरी (पारशी भाषेत) अर्थात पोती साठवली जायची. म्हणूनच याला ‘बोरीबंदर’ असं म्हटलं जायचं.
हि बिल्डींग बांधावयाच्या वेळी वीज अजून आलेली नव्हती त्या मुळे आत्ताच्या मेट्रो सिनेमा पर्यंत मातीचा रँप (भराव)तयार केला गेला होता,सदरहू ईमारत बांधते वेळी तेथ पासून ते मोठ मोठाले दगड त्या भरावावरून मजुरा करवी ढकलत आणून हि उंच ईमारत उभी करण्यात आली होती नि जस जसे बांधकाम पूर्ण होत जाईल तसं तसे ते बुजवून टाकावे लागत असे केल्यानेच कोणतीही प्रचलित काळातील मशिनरी नसताना सुद्धा इतक्या उंच इमारती,देवळे त्या काळी बांधली गेली आहेत.बांधकाम पूर्ण झाल्यावर तो मातीचा भराव काढून टाकल्या वर ती संपूर्ण ईमारत देऊळ नजरेस पडत असे.थोडक्यात म्हणजे कोणत्याही अगदी बारीक चुकीला सुद्धा त्या काळी पुन्हा ईमारत बांधते वेळीच वाव रहात नसे.या आव्हानपूर्ण आणि जाणकारीच्या कामासाठी करण्यात आलेली एफ. डब्ल्यू. स्टिव्हन्सची नियुक्ती किती अचूक होती हे त्यावरून दिसते. आणखी एका मुख्य कार्यालयाच्या इमारतीचे रेखाटन करण्यासाठी स्टीव्हन्स यांनाच निवडले जावे यात आश्चर्य नाही. स्टीव्हन्सवर बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोशनच्या इमारतीची रचना करण्याचे कामही सोपवले होते. व्हिक्टोरिया टर्मिनस समोरची ही इमारत १८९३ मध्ये पूर्ण झाली.
या इमारतीवर लंडनच्या सेंट पैंक्रास स्टेशनचा प्रभाव दिसून येतो. यासाठी स्टीव्हन्सनने इमारतीचे काम सुरू करण्याअगोदर लंडनच्या सेंट पैंक्रास स्थानकासहित युरोपमधील बर्‍याच स्थानकांची वास्तू प्रत्यक्षात जाऊन बघितली. त्यानंतर, आशियातील सर्वात मोठी अशी रेल्वेची इमारत आकारास येऊ लागली. असं असलं तरी व्हिक्टोरियन गॉथिक शैली आणि परंपरागत भारतीय स्थापत्यकलेचा संगम आढळतो. थोडक्यात, याची बांधणी इंडो-सारसेनिक पद्धतीने करण्यात आली आहे. संपूर्ण बांधकाम दगडी असून आतील भागासाठी मात्र लाकडाचा वापर केला आहे. याशिवाय रंगीत काचा, पितळ आणि लाकडावर कलाकुसर केलेलं नक्षीकाम पाहायला मिळतं. नक्षीकाम केलेले दरवाजे, तिकीट कार्यालयाजवळ असलेली नक्षी आणि लांबलचक जिना, भव्य असा कॉन्फरन्स हॉल या सगळ्या गोष्टी त्या काळी ‘बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट्स’च्या विद्यार्थ्यांनी डिझाइन केल्या आहेत.
बोरीबंदर इमारतीचे (सीएसटी) काम सुरू असतानाच १ जानेवारी १८८२ रोजी ही इमारत लोकांसाठी खुली करण्यात आली. त्याच वेळी बोरीबंदरचे ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ असे नामकरण २० जून १८८७ रोजी करण्यात आले आणि ही इमारत अधिकृतरीत्या सुरू होण्यास १८८८ साल उजाडले. या टर्मिनसमध्ये फक्त एक मार्गच होता. १८८५ मध्ये दोन मार्ग टाकण्यात आले. त्यानंतर, तीन वर्षांनंतर पहिला प्लॅटफॉर्म येथे बनला. येथूनच हार्बर मार्ग १९२५ मध्ये सुरू झाला. याच वर्षात मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम सुरू झाले.स्थानकाच्या वाढलेल्या विस्तारानंतर आता या ठिकाणी १८ प्लॅटफॉर्म असून उपनगरीय लोकलबरोबरच लांब पल्ल्यांच्या गाड्याही सुटतात.
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाची सत्ता आल्यावर या स्थानकाचे छत्रपती शिवाजी टर्मिनस ( सीएसटी ) असे नामकरण करण्यात आले. २ जुलै २००४ मध्ये या स्टेशनला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलं. २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याने हे स्थानक पुन्हा एकदा जागतिक चर्चेत आलं. कोणालाही अभिमान वाटावा असं हे सर्वाच्या परिचयाचं सीएसटी स्टेशन. ‘रोज लाखो प्रवाशांना पोटाशी धरणारे स्टेशन’ एवढीच मुंबईच्या सीएसटीची ओळख नाही; अप्रतिम कलाकुसर असलेली गॉथिक शैलीतील भव्यदिव्य वास्तू, ही तिची आणखी एक मोलाची ओळख.
योगेश शुक्ल
जळगाव.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page