जळगाव समाचार डेस्क | २० सप्टेंबर २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प केला आहे, आणि या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी तरुणांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कामगार, रोजगार तथा युवा कार्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले. पुण्यात एसपी महाविद्यालयात आयोजित ‘विकसित भारत अॅम्बेसेडर – युवा कनेक्ट’ या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात केंद्रीय युवा कार्य राज्यमंत्री रक्षा खडसे, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्निल कुसाळे, केंद्रीय युवा कार्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव नितीश मिश्रा, आणि शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष एस. के. जैन उपस्थित होते.
महाराष्ट्रात ‘विकसित भारत अॅम्बेसेडर – युवा कनेक्ट’ उपक्रमाची सुरुवात
‘विकसित भारत अॅम्बेसेडर – युवा कनेक्ट’ या उपक्रमाची महाराष्ट्रात सुरुवात पुण्यातून करण्यात आली. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी तरुणांची जबाबदारी काय आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक ‘पेड माँ के नाम’ उपक्रमाअंतर्गत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर डॉ. मांडवीय यांनी एसपी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “विकसित भारताचे स्वप्न सामर्थ्यवान विद्यार्थ्यांच्या बळावर पूर्ण होणार आहे. मात्र, यासाठी सुयोग्य नियोजन आवश्यक आहे. पूर्वीच्या सरकारांनी फक्त घोषणा दिल्या, पण त्या कृतीत उतरल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र विकसित भारतासाठी ठोस नियोजन केले आहे.”
My Bharat पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
केंद्रीय युवा कार्य राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विद्यार्थ्यांना My Bharat पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले. “विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत, आणि My Bharat पोर्टलच्या माध्यमातून त्यांना देशसेवेची मोठी संधी उपलब्ध झाली आहे,” असे त्यांनी सांगितले.
स्वप्निल कुसाळेचा प्रेरणादायी प्रवास
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्निल कुसाळे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून आपला खेळातील प्रवास सांगितला. त्याचबरोबर, केंद्रीय युवा कार्य मंत्रालयाच्या विविध योजनांचा खेळाडूंनी फायदा घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.
या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील तरुणांना देशाच्या विकासात आपला सक्रिय सहभाग नोंदवण्याची संधी मिळणार आहे.