जळगाव समाचार डेस्क| २३ सप्टेंबर २०२४
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांना मुख्य प्रवेशद्वारापासून प्रशाळांपर्यंत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आली. विद्यार्थ्यांना होणाऱ्या गैरसोयीमुळे ही मागणी पुढे आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंना यासंदर्भात निवेदन देत विद्यार्थ्यांच्या हितासाठी तत्काळ पावले उचलण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख निशांत चौधरी, जळगाव महानगर विद्यार्थी अध्यक्ष फैजान राजू पटेल, हर्षल दहीकर, जयेश पाटील, आणि रितेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रशासकीय इमारतीपर्यंत तीन किलोमीटरचे अंतर असल्याने विद्यार्थ्यांना चालत जाणे अत्यंत त्रासदायक होत आहे. विशेषतः मुलींना चालत जाण्याची गैरसोय होऊ लागली आहे. विद्यापीठात उपलब्ध असलेल्या सायकल सुविधा अकार्यक्षम असल्याने विद्यार्थ्यांची आणखीच अडचण होत आहे.
या मागणीसह दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष वाहतूक सुविधा उपलब्ध करण्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने यावर तत्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.