जळगाव समाचार | ७ नोव्हेंबर २०२५
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी कतरिना कैफ आणि विकी कौशल आता आई-बाबा झाले आहेत. कतरिनाने आज, ७ नोव्हेंबर रोजी मुलाला जन्म दिल्याची माहिती विकीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली. ‘Blessed’ असं कॅप्शन देत विकीने “आम्ही खूप प्रेमाने आणि कृतज्ञतेने आमच्या मुलाचं स्वागत करतोय,” असं लिहित ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. काही दिवसांपूर्वीच या दाम्पत्याने त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं जाहीर केलं होतं.
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी आई बनली असून, लग्नाच्या चार वर्षांनंतर या दाम्पत्याने त्यांच्या पहिल्या अपत्याचं स्वागत केलं आहे. या पोस्टनंतर चाहत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. माधुरी दीक्षित, सोनम कपूर, करीना कपूर, प्रियांका चोप्रा, आयुष्मान खुराना, परिणीती चोप्रा, मलायका अरोरा यांसारख्या अनेक कलाकारांनी कमेंटद्वारे कतरिना-विकीचे अभिनंदन केले.
कतरिना आणि विकी यांनी २०२१ मध्ये राजस्थानमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करत लग्न केलं होतं. जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभाचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर करीत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. लग्नानंतर चार वर्षांनी या दाम्पत्याने मुलाच्या जन्माची खुशखबर दिल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

![]()




