जळगावात वारली चित्रकला प्रदर्शनाचे महापौर दिपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

 

जळगाव समाचार | १८ मार्च २०२६

लोकचित्रकलेचा प्रचार आणि प्रसार होणे काळाची गरज असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळू शकते, असे प्रतिपादन जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दिपमाला काळे यांनी केले. त्या जळगावातील पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्या कलादालनात आयोजित वारली चित्रकला प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. भुसावळ येथील चित्रकार रमाकांत भालेराव यांच्या कलाकृतींचे हे प्रदर्शन सोमवार, दि. १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता महापौर काळे यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या वेळी रंगकर्मी शंभू पाटील, योगेश मांडे, बिपिन शाह आणि गिरीश डेरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी महापौर काळे यांनी वारलीसारख्या पारंपरिक लोककलेचा वारसा जपण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत ही कला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यास त्यांच्या कलागुणांना नवे व्यासपीठ मिळेल, असे नमूद केले. प्रदर्शनास भेट दिल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी चित्रकार रमाकांत भालेराव यांच्या कलाकृतींचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेश्री देशमुख यांनी केले. या प्रसंगी भुसावळ येथील रंगकर्मी व चित्रकार अनिल कोष्टी, नृत्यशिक्षिका चारू भालेराव, संपदा भुरे, सन्मुख चोरडिया यांच्यासह मोठ्या संख्येने कला रसिक उपस्थित होते. सदर प्रदर्शन ३० मार्चपर्यंत दररोज सकाळी साडेदहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत, बुधवार वगळता, सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले असून जळगावकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चित्रकार रमाकांत भालेराव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here