जळगाव समाचार | २१ ऑगस्ट २०२५
एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथे मका पिकांचे रक्षण करण्यासाठी अनधिकृतरीत्या टाकलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारेमुळे पाच जणांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) नेण्याच्या प्रक्रियेदरम्यान रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली.
मृतदेहांना घेऊन एमएच 19 एम 9246 क्रमांकाची रुग्णवाहिका वरखेडीतून जळगावकडे निघाली होती. मात्र, पाळधी बायपासने प्रवास करताना हा मार्ग GMCकडे जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर वाहन पुन्हा मागे वळवावे लागले. महामार्गाने जळगाव शहराकडे येताना रुग्णवाहिका आकाशवाणी चौकातच बंद पडली. या वेळी GMCकडून तत्काळ दुसरी रुग्णवाहिका (RJ 14 PE 6016) पाठवण्यात आली. बंद पडलेल्या रुग्णवाहिकेला दोर बांधून टो करून GMCच्या प्रवेशद्वारापर्यंत आणण्यात आले. प्रवेशद्वारापासून आपत्कालीन कक्षासमोर मृतदेह नेण्यासाठी वाहनाला प्रत्यक्ष ढकलून उभे करावे लागले. त्यानंतर डॉक्टरांनी सर्व मृतांना अधिकृतपणे मृत घोषित केले.
दरम्यान, विजेच्या धक्क्यामुळे मृत्यूमुखी पडलेले सर्वजण आदिवासी कुटुंबातील असून ते मजुरीसाठी या भागात आले होते. या घटनेत दीड वर्षांची दुर्गा बारेला ही बालिका मात्र थोडक्यात बचावली असून ती किरकोळ जखमी झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस तसेच प्रशासनिक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. तर महसूल विभागातून प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड आणि तहसीलदार प्रदीप पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून पाहणी केली. वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता रामपाल गेडाम व कक्ष अभियंता उमेश वाणी यांनी अनाधिकृत वीजजोडणीसंदर्भात पंचनामा केला.
तथापि, पंचनामा करण्यासाठी मृतांचे नातेवाईक हजर नसल्याने बुधवारी संध्याकाळपर्यंत शवविच्छेदन होऊ शकले नव्हते, अशी माहिती GMCचे अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी दिली.