वरणगाव फॅक्टरीतील सुपरवायझरचा भरदिवसा खून, परिसरात खळबळ…

0
72

जळगाव समाचार डेस्क | १२ सप्टेंबर २०२४

वरणगाव आयुध निर्माणी वसाहतीत बुधवारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास ४८ वर्षीय प्रदीप जयसिंग इंगळे यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रदीप इंगळे हे वरणगाव फॅक्टरीत सुपरवायझर पदावर कार्यरत होते आणि नेहमीप्रमाणे ते ड्युटीवरून दुपारच्या जेवणासाठी घरी आले होते. याचवेळी अज्ञात व्यक्तींनी त्यांचा लाकडी बॅट आणि इतर वस्तूंनी मारून निर्घृण खून केला.

खबर मिळताच वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय भरत चौधरी, पीएसआय गांगुर्डे, पीएसआय सुशील सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीमने घटनास्थळी तपासणी केली. यावेळी सुरक्षा विभागाचे कर्मचारी आणि व्यवस्थापन अधिकारी यांनीही घटनास्थळी भेट दिली.

घटनास्थळी तपासणी दरम्यान, पोलिसांनी तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे, परंतु अद्याप या खुनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मयत प्रदीप इंगळे यांचे त्यांच्या पत्नीशी न्यायालयात वाद सुरू होते, तसेच शेतीसंदर्भातही काही वाद असल्याचे समजते. प्रदीप इंगळे हे मुक्ताईनगर येथील रहिवाशी होते आणि उचंदा येथे त्यांची शेती आहे.

ही घटना स्टेट बँक परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात घडल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी परिसरात तपास सुरू केला असून, प्रदीप इंगळे यांच्या डोक्यावर आणि छातीवर गंभीर वार केल्याचे समजते. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

भुसावळ पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनीही घटनास्थळी भेट दिली असून, वरणगाव पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here