जळगाव समाचार | ३१ मार्च २०२६
जळगाव जिल्ह्यातील यावल परिसरात लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वनविभागातील कर्मचाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ठोस कारवाई करत गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यावल येथील वनरक्षक भैय्यासाहेब भीमराव गायकवाड यांच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारदार हे यावल परिसरातील रहिवासी असून ते बोलेरो पिकअप वाहनांद्वारे लाकूड वाहतुकीचा व्यवसाय करतात. ही वाहतूक कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहावी आणि वनविभागाकडून कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये, यासाठी वनरक्षक गायकवाड यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने २० मार्च रोजी जळगाव येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली.
तक्रारीची गंभीर दखल घेत एसीबी पथकाने या प्रकरणाची पडताळणी केली असता, संबंधित वनरक्षकाने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. पुढील कारवाईदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये तडजोड होऊन ९ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, सापळा रचण्यात आलेल्या कारवाईदरम्यान आरोपीला संशय आल्याने त्याने प्रत्यक्ष रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली.
असे असले तरी, लाच मागितल्याचे ठोस पुरावे एसीबीच्या हाती लागल्याने भैय्यासाहेब भीमराव गायकवाड यांच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे वनविभागात खळबळ उडाली असून, लाचखोरीच्या प्रकरणांवर प्रभावी अंकुश बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे, बाळू मराठे, राकेश दुसाने आणि सुरेश पाटील यांच्या पथकाने सापळा यशस्वीरीत्या राबवला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करत आहेत.

![]()




