जळगाव समाचार | १० एप्रिल २०२५
सप्तश्रृंगी गडावर सध्या सुरू असलेल्या चैत्रोत्सवानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी झाली असून, त्यामुळे प्रशासनाचे नियोजन अपयशी ठरले आहे. गुरुवारी गडाच्या पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती निर्माण झाली.
बुधवारी रात्रीपासूनच राज्यभरातून आलेल्या भाविकांची गडावर गर्दी होऊ लागली होती. गुरुवारी सकाळी या गर्दीत आणखी भर पडल्याने परिसरात नियंत्रण राखणे कठीण झाले. दर्शनासाठी आलेल्या लहान मुलं, महिला आणि वयोवृद्धांना या गोंधळाचा विशेष फटका बसला. प्रशासनाने लावलेली बॅरिकेड्स काही ठिकाणी तुटली आणि त्यामुळे गर्दीचा ताण अधिक वाढला.
गर्दीमुळे भवानी चौकातील व्यापाऱ्यांचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. परिसरात पाय ठेवायला देखील जागा उरली नव्हती. प्रशासनाने पूर्वी दोन-तीन बैठका घेतल्या होत्या, मात्र त्यातील निर्णयांची योग्य अंमलबजावणी करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसून आले.
भाविकांच्या मते, दर्शनासाठी जाणाऱ्यांसाठी आणि परतणाऱ्यांसाठी स्वतंत्र लाईनचे नियोजन आवश्यक होते. तसेच दुकानदारांसमोर होणारी गर्दी कमी करण्यासाठीही स्वतंत्र यंत्रणा हवी होती. मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती उद्भवली.
सप्तश्रृंगी देवी मंदिरातील चैत्री नवरात्रोत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. रामनवमीपासून सुरू होणारा हा उत्सव हनुमान जयंतीपर्यंत चालतो. खान्देशवासीयांचे कुलदैवत असलेल्या देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक मोठ्या श्रध्देने पायी चालत येतात. उपवास करत रखरखत्या उन्हात गड चढणाऱ्या या भाविकांची देवीप्रती असलेली श्रध्दा पाहण्यासारखी असते.
गडावरील हा ‘सासर-माहेर’ भाविकांच्या भावनेचा भाग असून, त्यांच्यासाठी ही यात्रा एक श्रद्धेची परंपरा बनली आहे. मात्र, वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक ठोस आणि प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

![]()




