जळगाव समाचार डेस्क| २३ सप्टेंबर २०२४
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंगी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. येत्या 23 ते 26 सप्टेंबरपर्यंत घाट रस्ता वाहतुकीसाठी सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या चार दिवसांच्या कालावधीत भाविकांनी त्यांच्या प्रवासाचा मार्ग बदलण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सप्तश्रृंगी घाटात सध्या दरड प्रतिबंधक जाळी बसविण्याचे काम सुरू असून, हे काम पर्यटन तीर्थक्षेत्र विकास निधीच्या अंतर्गत करण्यात येत आहे. घाटातील सैल दगड काढले जात आहेत, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कळवण उपविभागीय अधिकारी अकुनुरी नरेश यांनी ही माहिती दिली आहे.
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर काम
गणेशोत्सवानंतर भाविकांमध्ये नवरात्र उत्सवाची उत्सुकता वाढलेली असते. नवरात्री दरम्यान देवीची पूजाअर्चा, आरती आणि जागरण केले जाते. सप्तश्रृंगी गडावर नवरात्री व कोजागिरी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर सुरू आहे.
सप्तश्रृंगी गडाची महती
सप्तश्रृंगी गड हा नाशिकपासून 60 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात आहे. समुद्रसपाटीपासून 4659 फूट उंचीवर असलेले हे मंदिर सात शिखरांनी वेढलेले आहे. देवीची मूर्ती पाषाणात कोरलेली असून आठ फूट उंच आहे. देवीच्या मूर्तीला 18 हात असून त्यात विविध आयुधे आहेत.
येथील देवीला महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध पीठ मानले जाते. चैत्र आणि अश्विन नवरात्रात येथे मोठ्या यात्रांचे आयोजन होते. त्यामुळे आगामी नवरात्रीसाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाच्या सूचनेनुसार, भाविकांनी या चार दिवसांच्या कालावधीत गडावर येण्याचे टाळावे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने घातलेल्या अटींचे पालन करावे.