जळगाव समाचार | २२ मार्च २०२५
एरंडोल तालुक्यातील उत्रान गावच्या हद्दीत सर्रासपणे 40 ते 50 ट्रॅक्टर आणि मशिनद्वारे अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाला माहिती देऊनही कारवाई होत नसल्याने महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादानेच ही वाळू वाहतूक सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, अखेर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात वाळू जप्त केली आहे.
उत्रान गावच्या हद्दीतून वाहणाऱ्या गिरणा नदीत दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरू असून, सुमारे 40 ते 50 ट्रॅक्टर आणि 6 क्रेनद्वारे मोठ्या प्रमाणावर रेती उपसा केला जात आहे. या वाळूचा साठा ख्वाजा मियां दर्ग्याजवळील तीन ठिकाणी केला जात असल्याचे आढळले. मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी जवळपास 125 ते 150 ब्रास वाळूचा साठा केला होता. या अवैध वाळू उपशाबाबत 112 हेल्पलाईन वर माहिती दिल्यानंतर मात्र, तब्बल दोन तासांनी पोलीस प्रशासनाने दखल घेतली. त्यानंतर महसूल आणि तहसील प्रशासनाने संयुक्त कारवाई करत सुमारे 100 ब्रास वाळू जप्त केली.
या कारवाईदरम्यान, उशीर झाल्याने सर्व ट्रॅक्टर आणि मशीन घटनास्थळावरून पसार झाल्या, त्यामुळे प्रशासनाच्या हाती केवळ वाळूचे ढिगारे लागले आहेत. या प्रकारामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेती उपसा करणारे आणि त्याचा साठा करणारे नक्की कोण, याचा तपास पोलीस घेत आहेत.
उत्रानप्रमाणेच, रवंजे गावाच्या हद्दीतही मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. गिरणा नदीतून मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू उपसा केला जात असून, तो वेगवेगळ्या ठिकाणी साठवला जात आहे. स्थानिक प्रशासनाला या वाळू उपशाची माहिती मिळत नाही का, की हे काम प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू आहे, याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या अंधारात डंपरच्या सहाय्याने वाळू वाहतूक केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन कारवाई करत नसल्याची नागरिकांची ओरड आहे.
या कारवाईवेळी सर्कल अधिकारी श्री. शिंपी, तलाठी शिवाजी घोलप, नरेश शिरूर, पोलीस पाटील पप्पू तिवारी, पोलीस पाटील राहुल महाजन आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. जप्त केलेली वाळू प्रशासनाने वाहून नेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. 112 नंबरवर तक्रार देऊनही दोन तास विलंब झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून वाळू तस्करांना अभय दिले जात असल्याचा आरोप होत असून, या प्रकरणी अधिक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.