पाचोरा तालुक्यातील उपसरपंचाचा भिंत अंगावर कोसळल्याने मृत्यू

0
37

 

जळगाव समाचार डेस्क | ११ सप्टेंबर २०२४

पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलास रतीलाल कुमावत (वय ३९) यांचा बांधकामाच्या भिंतीखाली दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विलास कुमावत हे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद सांभाळत स्वतः गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रविवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील एका बांधकाम स्थळी काम करत असताना अचानक बांधकामाची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेत कुमावत गंभीर जखमी झाले.
त्यांना तात्काळ पाचोरा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन दिवस मृत्यूशी झुंज देत असतानाच १० सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
विलास कुमावत यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here