उन्नाव बलात्कार प्रकरणात कुलदीप सेंगरला दिलासा नाही; सर्वोच्च न्यायालयाची दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती

जळगाव समाचार | २९ डिसेंबर २०२५

उन्नाव बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या भाजपाच्या माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सेंगरच्या जन्मठेपेच्या शिक्षेला दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत त्या निर्णयावर स्थगिती दिली आहे. त्यामुळे सेंगरची तुरुंगातून सुटका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

२०१७ साली अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कुलदीप सिंह सेंगर दोषी ठरला होता. डिसेंबर २०१९ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात दाखल केलेल्या अपीलवर २३ डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. पीडिता व तिच्या नातेवाईकांनी दिल्ली येथे आंदोलन केले होते, तर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायाधीश जे. के. माहेश्वरी आणि न्यायाधीश ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर झाली. केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता यांनी हा अल्पवयीन मुलीवर झालेला अत्यंत गंभीर गुन्हा असून पोक्सो कायदा व भारतीय दंड विधानाच्या तरतुदींनुसार शिक्षा ठोठावण्यात आल्याचे नमूद केले. दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश स्वीकारला गेल्यास त्याचे भविष्यात चुकीचे अर्थ लावले जाऊ शकतात, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने त्या आदेशाला स्थगिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here