जळगाव समाचार | २९ ऑगस्ट २०२५
जळगाव जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने आधीच उडीद पिकापासून अपेक्षित उत्पादनाची आशा शेतकऱ्यांनी सोडली होती. त्यात आता ऐन काढणीच्या काळात सुरू झालेला सततचा पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने परिपक्व अवस्थेतील पीक शेतातच वाया जात आहे. शेंगांतील दाण्यांना कोंब फुटू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले असून त्यांना मोठ्या आर्थिक फटक्याची भीती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात कडधान्य पिकांचे एकूण क्षेत्र ४६ हजार ४१० हेक्टर असून यंदा ते घटून ४३ हजार १२० हेक्टरवर आले आहे. त्यात उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र १६ हजार १८१ हेक्टर असताना पेरणी घटल्याने यंदा ते केवळ १३ हजार ८९० हेक्टरवर थांबले आहे. पावसाचे उशिरा आगमन, वाढीच्या अवस्थेतील पावसाचा खंड आणि आता काढणीच्या वेळी सुरू झालेला मुसळधार पाऊस यामुळे उडदाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी संबंधित शेतकऱ्यांचा खर्चदेखील न वसूल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पावसाची अधूनमधून हजेरी लागल्याने शेतकऱ्यांना पीक काढण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे बाजारात उडदाला अपेक्षित भाव मिळण्याची शक्यता देखील धूसर झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुबार नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांकडून सरसकट पंचनामे करून तातडीने शासकीय मदत व भरपाई देण्याची मागणी होत आहे.