माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अ‍ॅन्जिओप्लास्टी…

जळगाव समाचार डेस्क | १५ ऑक्टोबर २०२४

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईतील एच.एन. रिलायन्स रुग्णालयात अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना अस्वस्थता जाणवत होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तपासणी केली असता, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे निदान झाले आणि डॉक्टरांनी तातडीने अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. ही त्यांची तिसरी अ‍ॅन्जिओप्लास्टी असून, यापूर्वी 2012 मध्ये जुलै आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांच्यावर दोन वेळा अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली होती.

मुख्यमंत्री असताना 2021 मध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर मणक्याचे ऑपरेशनही झाले होते. उद्धव ठाकरे यांच्या आरोग्याबाबत आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत माहिती दिली की, “तुमच्या शुभेच्छांमुळे सर्व काही ठीक आहे, उद्धव ठाकरे सर पुन्हा कार्यरत होण्यासाठी आणि तुमच्यासेवेसाठी तयार आहेत.”

अ‍ॅन्जिओप्लास्टी म्हणजे काय?

अ‍ॅन्जिओप्लास्टी ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्यास त्याचे निराकरण केले जाते. सुरुवातीला ब्लॉकेज आहेत की नाही हे तपासण्यासाठी अ‍ॅन्जिओग्राफी केली जाते. जर ब्लॉकेज आढळले तर अ‍ॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी केली जाते. अ‍ॅन्जिओप्लास्टी करताना, मांडीतून रक्तवाहिनीत एक पातळ ट्युब टाकून ब्लॉकेज पर्यंत नेली जाते. या ट्युबच्या टोकाला हवा भरता येईल असा बलून असतो, ज्याद्वारे ब्लॉकेज दूर केले जाते.

निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांची प्रकृती

उद्धव ठाकरे यांनी 2 दिवसांपूर्वी शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेतला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेलाही ते उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमांनंतर काही तासांतच त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आणि अ‍ॅन्जिओप्लास्टीची प्रक्रिया पार पडली.

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रचाराला पुढील काही दिवसांत गती येण्याची शक्यता आहे. परंतु, अ‍ॅन्जिओप्लास्टीमुळे उद्धव ठाकरे यांना काही काळ विश्रांती घ्यावी लागेल, त्यामुळे त्यांचा प्रचारात सहभाग मर्यादित होऊ शकतो. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते. साधारण दसऱ्यानंतर आचारसंहिता लागू होईल अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here