जळगाव समाचार डेस्क | ३० सप्टेंबर २०२४
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. “अमित शहा म्हणजे अहमद शहा अब्दाली,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “काही दिवसांपूर्वी बाजारबुणगे इथे येऊन गेले होते. ते मला औरंगजेब म्हणतात. पण मी औरंगजेब तर तुम्ही कोण? तुम्ही तर अहमद शहा अब्दाली,” असे म्हणत त्यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते पुढे म्हणाले, “अमित शहा जिथे येतात तिथे मी येऊन त्यांना फटकारतो. त्यांनी उद्धव ठाकरेला संपवण्याचे आव्हान दिले आहे, पण हिंमत असेल तर छत्रपती शिवरायांच्या साक्षीने आम्हाला संपवून दाखवा,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.
भाजपवर जोरदार टीका, लाडकी बहीण योजनेवरही साधला निशाणा
उद्धव ठाकरे यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. “25 ते 30 वर्षे आम्ही तुमच्यासोबत होतो, पण कधी शिवसेनेची भाजप झाली नाही. मग आता शिवसेनेची काँग्रेस झाली, असे कसे म्हणता?” असा सवाल त्यांनी केला. त्यांनी एकनाथ खडसेंचा उल्लेख करत जागावाटपाच्या चर्चेतील प्रसंग सांगितला. “वरून आदेश आल्यामुळे युती तोडावी लागेल, असे खडसे म्हणाले होते. मात्र, आम्ही निवडणुका लढवून जिंकलो,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी टीका केली. “1500 रुपयांत घर चालते का? मुलांचे शिक्षण होईल का?” असा सवाल करत त्यांनी सरकारच्या या योजनेवर सवाल उपस्थित केला. “आम्ही हक्काचे मागतो, भीक नको,” असे म्हणत मोदी-शहा यांच्यावरही टीका केली.
मालवण किल्ल्यातील पुतळा दुर्घटनेवर मुख्यमंत्री शिंदेवर टीका
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किल्ल्यावर पुतळा कोसळल्याच्या घटनेवरही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “मिंधे दाढी खाजवत म्हणतात वाऱ्यामुळे पुतळा पडला. वाऱ्याने तुमची दाढी उडत नाही, मग महाराजांचा पुतळा कसा पडतो?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना सांगितले की, महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सतत झुंजवत ठेवून मोक्याच्या भूखंडांचा लाभ काही लोक घेत आहेत. आपल्या सरकारच्या काळात आपल्या माणसांना नवे भूखंड देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

![]()




