जळगाव समाचार | २८ मार्च २०२५
जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जळगावमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला रंगकर्मींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला जळगावचे आमदार राजू मामा भोळे, भाजप महानगर अध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, अखिल भारतीय नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे, अविनाश पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी हेमंत कुलकर्णी, चिंतामण पाटील, शरद पांडे, सुभाष मराठे, विजय पाठक, रमेश भोळे, नितीन देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी ५:५५ वाजता नटराजन पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
संगीत, नाटक व काव्याने भरलेल्या या स्नेहसंमेलनात श्री. संगपाल तायडे यांच्या सुमधुर गाण्याने रंगत आणली. ज्येष्ठ रंगकर्मी शरद पांडे यांनी मनोगत व्यक्त केले, तर शरद भालेराव यांनी प्रभावी एकपात्री प्रयोग सादर केला. तसेच गौरव मेहता, चंद्रकांत चौधरी, गणेश सोनार (मिमिक्री), सरीता तायडे (लावणी), शीतल नेवे (गायन) आणि अमोल ठाकूर यांनी जळगावच्या सांस्कृतिक परंपरेचे वर्णन करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले. भाऊंचे उद्यान, काव्यरत्नावली चौक येथे रंगलेल्या या स्नेहसंमेलनात अनेक रंगकर्मी सहभागी झाले. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीच्या योगदानाची जाण ठेवत जळगावच्या रंगकर्मी समाजाने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

![]()




