जळगाव समाचार | २१ नोव्हेंबर २०२५
दुबईमध्ये सुरू असलेल्या एअर शो–२५ दरम्यान भारतीय हवाई दलाच्या तेजस लढाऊ विमानाचा भयावह अपघात झाला. शुक्रवारी दुपारी २.१० वाजता हा प्रकार घडला. प्रात्यक्षिकासाठी आकाशात झेपावल्यानंतर काही क्षणांतच विमान संतुलन गमावून जमिनीवर कोसळले. कोसळताच मोठा स्फोट झाला आणि आग व धुराचे प्रचंड लोळ उठले.
भारतीय हवाई दलाचे तेजस आणि सूर्यकिरण एरोबेटिक्स टीम गेल्या आठवड्यात एअर शोमध्ये सहभागासाठी अल मक्तोम हवाई तळावर दाखल झाली होती. एअर शोदरम्यान चित्तथरारक कसरती सादर करण्यासाठी तेजस आकाशात उड्डाण करत होते; मात्र कसरती सुरू होण्यापूर्वीच विमान खाली आले.
घटनास्थळी पोलीस व आपत्कालीन सेवांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. भारतीय हवाई दलाने अपघाताची अधिकृत पुष्टी केली असून, “तेजस विमान कोसळल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची सविस्तर चौकशी सुरू असून, काही वेळात अतिरिक्त माहिती दिली जाईल,” असे हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
या अपघातात विमानातील पायलट गंभीर जखमी झाल्याची माहिती हवाई दलाने दिली आहे.
तेजस लढाऊ विमानाचा हा दुसरा मोठा अपघात मानला जात आहे. यापूर्वी २०२४ मध्ये जैसलमेरजवळ तेजस विमान कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती.

![]()




