जळगाव समाचार डेस्क| ६ सप्टेंबर २०२४
“शिक्षक हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत भावी पिढीचे शिल्पकार बनतात,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी शिक्षक दिनानिमित्त केले. भारताचे माजी राष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो. या निमित्ताने खडसे यांनी मुक्ताईनगरमधील विविध शाळांना भेट देऊन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
मुक्ताईनगर येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, डॉ. जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, अलफलाह उर्दू हायस्कूल आणि जे. ई. स्कूल ज्युनिअर कॉलेज येथे खडसे यांनी भेट देऊन शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी बोलताना खडसे म्हणाल्या, “शिक्षक हे समाजाच्या उभारणीचे खरे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी शिक्षक कठोर परिश्रम करतात. ज्ञानासोबतच नैतिक मूल्ये, तंत्रज्ञानाची ओळख, आणि संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे त्यांचे समाजावर अनंत ऋण आहेत. हे देखील एक प्रकारचे देशसेवेचे कार्य आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर, रावेर, आणि बोदवड तालुक्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन शिक्षकांना शुभेच्छा संदेश देत त्यांच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त केली.