जळगाव समाचार | २७ फेब्रुवारी २०२५
स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून फरार झालेल्या आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला फरार घोषित करत त्याच्या अटकेसाठी नागरिकांची मदत मागितली आहे. आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
मंगळवारी पहाटे 5 वाजता स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये पीडित तरुणीवर बलात्कार करण्यात आला. पुण्यात काम करणारी ही तरुणी फलटणला जाण्यासाठी बसस्थानकात आली होती. त्यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे याने तिला धमकावून अत्याचार केला आणि पसार झाला. बुधवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पीडितेची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी अहवालानुसार आरोपीने पीडितेवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या 48 तासांपासून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून, सुरुवातीला 8 पथके तैनात होती, आता 13 पथकांना कामाला लावण्यात आले आहे. आरोपी शिरूर तालुक्यातील गुनाट गावाचा रहिवासी असून, त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो सध्या जामिनावर बाहेर आहे.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याच्या 10 मित्र-मैत्रिणींची चौकशी केली आहे. त्याच्या घरी बंदोबस्त ठेवण्यात आला असून, आई-वडिलांना आणि भावाला चौकशीसाठी पुण्यात बोलावण्यात आले आहे. आरोपीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने स्वारगेट पोलिस ठाणे किंवा 100 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.