जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून “स्वच्छता ही सेवा” पंधरवडा

 

जळगाव समाचार | १५ सप्टेंबर २०२५

स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ अंतर्गत “स्वच्छता ही सेवा” 2025 हा पंधरवडा जिल्ह्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “स्वच्छोत्सव” या थीमखाली साजरा करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये राबविला जाणार असून, नागरिक, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि विविध विभागांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी केले आहे. अस्वच्छ ठिकाणांची निवड करून त्याची साफसफाई करणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, सफाईमित्र सुरक्षा शिबिरे, पर्यावरणपूरक व शून्य कचरा उत्सव, स्वच्छ सुजल गाव संकल्पनेसंदर्भातील जनजागृती अशा विविध उपक्रमांद्वारे स्वच्छतेचा संदेश गावोगावी पोहोचविण्यात येणार आहे. तसेच विशेष ग्रामसभा घेऊन हागणदारीमुक्त आणि अधिक मॉडेल गाव घोषित करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी “एक दिवस – एक तास – एक सोबत” या संकल्पनेतून देशव्यापी श्रमदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्या दिवशी अधिकाधिक नागरिकांनी आपल्या गावात श्रमदान करून या मोहिमेला हातभार लावावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे यांनी केले आहे. अभियानाचा शुभारंभ दि. १७ सप्टेंबर रोजी होणार असून, स्थानिक संस्था, विविध विभाग, लोकप्रतिनिधी, सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेऊन प्रभावी जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

“स्वच्छता ही सेवा पंधरवडा म्हणजे केवळ मोहिम नसून हा सामूहिक कृतीचा उत्सव आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सहभागातूनच जळगाव जिल्हा स्वच्छ, निरोगी व सुजल बनविण्याचे ध्येय साध्य होईल”. – मुख्य कार्यकारी अधिकारी,मिनल करनवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here