जळगाव समाचार डेस्क | १६ जानेवारी २०२५
स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्ता धारकांना मालकी हक्क प्रदान करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील ६० गावांमध्ये १८ जानेवारी रोजी सनद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी १२.२० वाजता देशभरात ५० लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण करत लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
स्वामित्व योजना राज्य महसूल विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायती राज मंत्रालय, भारत सरकारच्या पुढाकाराने राबवली जात आहे. या योजनेत गावठाण भूमापन करून जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यात येते. संबंधित मिळकत धारकांना मालकीचे सनद देऊन त्यांना अधिकृत दस्तऐवजाचा हक्क प्रदान केला जातो.
जळगाव जिल्ह्यातील सनद वाटप कार्यक्रमांतर्गत चोपडा तालुक्यातील २ गावे, यावल तालुक्यातील ५ गावे, मुक्ताईनगर तालुक्यातील ६ गावे, बोदवड तालुक्यातील १६ गावे, भुसावळ तालुक्यातील ३ गावे, जळगाव तालुक्यातील १ गाव आणि पाचोरा तालुक्यातील २७ गावे असे एकूण ६० गावांचा समावेश आहे.
गावातील सर्व नागरिकांनी योजनेचा लाभ घेत मालकी हक्काची सनद प्राप्त करून घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख एम. पी. मगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.