जळगाव समाचार | २३ ऑक्टोबर २०२५
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या चार वर्षांनंतर अखेर केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या रिपोर्टमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना पूर्णपणे निर्दोष घोषित करण्यात आले आहे. सुशांतला रियाने बेकायदेशीर पद्धतीने धमकावले, मानसिक त्रास दिला किंवा आत्महत्येस प्रवृत्त केले, असे कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत, असे सीबीआयने स्पष्ट केले आहे. तथापि, सुशांतच्या कुटुंबीयांनी या निष्कर्षावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “हा रिपोर्ट अर्धवट असून त्यात सत्य लपवले गेले आहे,” असा आरोप केला आहे.
१४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूत मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात मृतावस्थेत आढळला होता. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला सुशांत, पुढे ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘काय पो चे’, ‘छिछोरे’ अशा चित्रपटांतून बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच्या मृत्यूनंतर देशभरातून संताप आणि शोक व्यक्त झाला होता. प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेऊन सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला. यावर्षी मार्च महिन्यात सीबीआयने दोन स्वतंत्र क्लोजर रिपोर्ट दाखल केले — एक सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी पाटण्यात दाखल केलेल्या तक्रारीवर, तर दुसरा रिपोर्ट रियाने मुंबईत सुशांतच्या बहिणींविरोधात केलेल्या तक्रारीवर आधारित आहे.
सीबीआयच्या तपासात असे समोर आले की रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांनी ८ जून २०२० रोजी सुशांतचे घर सोडले होते, आणि त्यानंतर १४ जून रोजीच्या घटनेपर्यंत त्यांनी ना संपर्क साधला ना भेट घेतली. त्या काळात सुशांतची बहीण मीतू सिंह त्याच्यासोबत राहत होती. रियावर आर्थिक फसवणुकीचे आरोपही करण्यात आले होते, मात्र तपासात त्यालाही आधार मिळाला नाही. सीबीआयच्या अहवालानुसार, रियाने घरातून निघताना फक्त स्वतःचा लॅपटॉप आणि घड्याळ नेले होते, जे सुशांतने तिला भेट दिले होते.
रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, सुशांत स्वतःच्या सर्व आर्थिक व्यवहारांबाबत सजग होता आणि ते त्याचे चार्टर्ड अकाऊंटंट तसेच वकील हाताळत होते. त्यामुळे रिया किंवा तिच्या कुटुंबाकडून फसवणूक किंवा दबावाचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. “रिया सुशांतच्या आयुष्याचा आणि कुटुंबाचा भाग होती, त्यामुळे तिच्या खर्चाकडे फसवणुकीच्या दृष्टीने पाहता येत नाही,” असेही सीबीआयने नमूद केले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी होणार असून, त्यावेळी न्यायालय या क्लोजर रिपोर्टवरील पुढील निर्णय देणार आहे.

![]()




