जळगाव समाचार डेस्क | ७ ऑक्टोबर २०२४
‘बिग बॉस मराठी सीझन 5’ च्या घरात आपला ओरिजिनल स्वभाव आणि प्रामाणिकपणाने खेळ खेळत सर्वांचे मन जिंकणारा सूरज चव्हाण अखेर या सिझनचा विजेता ठरला आहे. सूरजने सोशल मीडियावर सुरू असलेल्या चाहत्यांच्या अपेक्षांना पुरेपूर न्याय देत विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली आहे. त्याच्या या यशामुळे सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच सूरजने त्याच्या खेळाने इतर स्पर्धकांना टास्कमध्ये कडवी टक्कर दिली होती. अनेक टास्कमध्ये त्याने आपली कौशल्ये दाखवली आणि कॅप्टन होण्याची संधीही मिळवली. त्यामुळे इतर दिग्गज स्पर्धकांपेक्षा सूरजने आपला वेगळा ठसा उमटवला. अंतिम फेरीत सूरजसोबत अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर आणि जान्हवी किल्लेकर या स्पर्धकांनीही आपले स्थान मिळवले होते.
अंतिम फेरीच्या दरम्यान, जान्हवी किल्लेकरने नऊ लाख रुपये घेऊन स्पर्धेतून माघार घेतली तर अंकिता वालावलकर देखील घराबाहेर पडली. टॉप चार स्पर्धकांमध्ये धनंजय पोवारला माघार घ्यावी लागली आणि सूरज, अभिजीत आणि निक्कीने टॉप 3 मध्ये धडक दिली. अखेर अभिजीत सावंतसोबत अंतिम टक्कर देत सूरज चव्हाणने विजेतेपद पटकावले. अभिजीत सावंत, जो इंडियन आयडॉलचा पहिला विजेता आणि एक सुप्रसिद्ध गायक आहे, तो या स्पर्धेत उपविजेता ठरला.
सूरज चव्हाण बारामती येथील मोडवे गावचा रहिवासी आहे. त्याचे बालपण अत्यंत खडतर गेले. लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाल्याने घरची परिस्थिती बिकट होती. त्याने केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. मात्र, त्याच्या मेहनतीने आणि जिद्दीने त्याला ‘बिग बॉस मराठी’ च्या विजेतेपदापर्यंत पोहोचवले.
सूरजला या विजेतेपदामुळे 14 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम मिळाली आहे. त्यासोबत पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सकडून दहा लाख रुपये आणि एक स्कूटरही देण्यात आली आहे. याशिवाय, प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला ‘झापुकझुपुक’ या चित्रपटात भूमिका देण्याची ऑफर दिली आहे. बिग बॉसच्या घरात गेस्ट म्हणून आलेले उत्कर्ष शिंदे यांनीही सूरजला एक खास गिफ्ट दिले होते आणि सांगितले की, ते सूरजसोबत एक गाणे बनवणार आहेत.
सूरजच्या या प्रवासामुळे त्याच्या गावात आणि सोशल मीडियावर आनंदाची लाट आहे. त्याच्या विजयामुळे बारामतीमधील तरुणांसाठी तो एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनला आहे.