जळगाव समाचार | १४ मार्च २०२५
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर तब्बल नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकले होते. अखेर त्यांच्या पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नासा आणि स्पेसएक्स यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, क्रू-10 मिशन शुक्रवारी रात्री ७:०३ वाजता म्हणजेच शनिवारी पहाटे ४:३० वाजता प्रक्षेपित केले जाणार आहे. या मोहिमेद्वारे विल्यम्स आणि विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणले जाईल.
याआधी, फाल्कन-९ रॉकेटच्या तांत्रिक समस्येमुळे हे प्रक्षेपण शेवटच्या क्षणी थांबवावे लागले होते. आता नव्याने वेळ ठरवण्यात आली असून, तांत्रिक निरीक्षणानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून फक्त आठ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे पृथ्वीवर परतणे लांबले.
प्रक्षेपण यशस्वी झाल्यास, हे दोघे २० मार्चनंतर अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर निघतील. त्याच वेळी, एक नवीन टीम आयएसएसमध्ये पाठवली जाणार आहे. या टीममध्ये नासाच्या अॅनी मॅकलेन आणि निकोल आयर्स, जपानच्या ताकुया ओनिशी आणि रशियाच्या किरिल पेस्कोव्ह यांचा समावेश असेल.
क्रू-10 मिशनसाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांनी दबाव टाकल्याची चर्चा सुरू आहे. याआधीच ही मोहीम दोन आठवडे आधी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.