जळगाव समाचार | १९ मार्च २०२५
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी (बुच) विल्मोर तब्बल 9 महिन्यांनंतर अखेर पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. भारतीय वेळेनुसार 19 मार्च रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांचे यान फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षित उतरले.
सुनीता विलियम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 18 मार्च 2025 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू केला. त्यांचा 17 तासांचा अवकाश प्रवास यशस्वी ठरला. स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून ते पृथ्वीवर पोहोचले. या मोहिमेत त्यांच्यासोबत निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह देखील होते.
अवकाशातून परतताना यानाचे तापमान 1650°C पर्यंत पोहोचले. यावेळी सुमारे 7 मिनिटे ग्राउंड टीमशी संपर्क तुटला होता. अखेर, पॅराशूटच्या मदतीने ड्रॅगन कॅप्सूल फ्लोरिडाजवळील समुद्रात उतरले. NASA आणि SpaceX टीमने अंतराळवीरांना तिथून बाहेर काढले. लँडिंगनंतर 10 मिनिटे यानाची सुरक्षा तपासणी करण्यात आली.
सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांनी 5 जून 2025 रोजी बोईंग अंतराळयानातून ISS साठी उड्डाण केले होते. त्यांना तिथे फक्त एक आठवडा राहायचे होते, पण यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते वेळेत परतू शकले नाहीत. त्यामुळे 10 दिवसांचे मिशन तब्बल 9 महिन्यांत बदलले.
आता ते सुखरूप परतल्याने NASA आणि SpaceX टीमने मोठा आनंद व्यक्त केला आहे.