ठरलं… सुनेत्रा पवार उद्या सायंकाळी ५ वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ…

 

जळगाव समाचार | ३० जानेवारी २०२६

राजकीय वर्तुळातून मोठी घडामोड समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार या उद्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले असून, महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार असून, त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या निर्णयापूर्वी राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला होता. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी उपमुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा केली होती. या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास होकार दिला. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आणि नेतृत्वाबाबत एकमत झाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत सत्तास्थापनेशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर अखेर उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

उद्या सकाळी ११ वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक होणार असून, या बैठकीत विधिमंडळ गटनेत्याची निवड केली जाणार आहे. यासाठी पक्षाकडून विधीमंडळास अधिकृत पत्र पाठवून सभागृह उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. अद्याप अधिकृत निरोप नसला तरी पक्षाचे अनेक नेते आणि आमदार सावधगिरी म्हणून मुंबईकडे रवाना झाले असून, काही आमदार आज रात्रीच तर काही उद्या सकाळपर्यंत मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here