जळगाव समाचार डेस्क| १५ डिसेंबर २०२४
भुसावळ येथील स्वामीनारायण गुरुकुलचे सचिव स्वामी ऋषिस्वरूपदास (२८) यांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीत “वायफाय कनेक्ट, मोबाइल चेक करा” असे लिहिलेले आढळले आहे.
ऋषिस्वरूपदास हे शनिवारी गुरुकुलचे प्रमुख स्वामी के.के. शास्त्री यांच्यासोबत गुजरातमधील वडताल येथे जाणार होते. मात्र, शुक्रवारी रात्री २ वाजेपर्यंत संस्थेच्या आवारात त्यांनी पाहणी केली. त्यानंतर शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह गुरुकुलच्या एका खोलीत आढळला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
स्वामी ऋषिस्वरूपदास मूळचे भुसावळ येथील महाजन गल्लीतील रहिवासी आहेत. त्यांचे वडिल उमेश कडू भारंबे हे रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी असून सध्या मुंबईत वास्तव्याला आहेत. ऋषिस्वरूपदास हे वयाच्या अडीच वर्षांपासून स्वामीनारायण गुरुकुलमध्ये सेवेसाठी समर्पित होते. त्यांचे शिक्षण गुरुकुल व नंतर गुजरातमध्ये झाले.
ते गेल्या १० वर्षांपासून सचिवपदाची जबाबदारी सांभाळत होते. स्वामी ऋषिस्वरूपदास यांना व्यायाम व जीमची विशेष आवड होती. त्यांच्या अचानक जाण्याने गुरुकुल तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी चिठ्ठीत दिलेल्या मोबाइल तपासण्याचे काम सुरू आहे. तसेच गुरुकुलमधील इतर व्यक्तींची चौकशी केली जात आहे.
स्वामी ऋषिस्वरूपदास यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येने गुरुकुल परिवार तसेच स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.