संत तुकाराम महराजांचे वंशज शिवव्याख्याते हभप शिरीष मोरे महाराज यांची आत्महत्या…

जळगाव समाचार डेस्क | ५ फेब्रुवारी २०२५

संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आणि प्रसिद्ध शिवव्याख्याते हभप शिरीष मोरे महाराज (वय 30) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे देहू परिसरासह संपूर्ण वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी रात्री जेवणानंतर शिरीष महाराज त्यांच्या खोलीत झोपायला गेले. मात्र, सकाळी उशिरापर्यंत ते बाहेर आले नाहीत. घरच्यांनी खोलीचे दार वाजवले, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दार तोडले असता, शिरीष महाराज यांनी उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यात नमूद आहे. ते प्रवचन, कीर्तन यामधून प्रसिद्ध होते. तसेच, त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी नवीन घर बांधले होते आणि एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता.

शिरीष महाराज यांच्या आत्महत्येने संपूर्ण मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे.

या घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी यासंदर्भात माहिती दिली. हभप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here