जळगाव समाचार डेस्क | २८ जानेवारी २०२५
मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅडवरून झालेल्या वादामुळे एका नवविवाहित अभियंता तरुणीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात उघड झाली. अश्विनी भावेशकुमार बादुले (२४, पारडी) असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी तिच्या पती भावेशकुमार (३२) याला पोलिसांनी अटक केली आहे.
अश्विनी आणि भावेशकुमार हे दोघेही अभियंता असून एका मोठ्या स्टील कंपनीत नोकरीस होते. नोकरीच्या ठिकाणी त्यांची ओळख झाली आणि त्यातून प्रेम फुलले. जून २०२४ मध्ये दोघांनी प्रेमविवाह केला. सुरुवातीला अश्विनीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला होता, मात्र नंतर ते तयार झाले.
लग्नानंतर अश्विनीने नोकरी सोडली आणि संसारात रमली. मात्र, सासू आणि पतीकडून तिच्यावर ताण येऊ लागला. मासिक पाळीच्या दरम्यान बाथरूममध्ये ठेवलेल्या सॅनिटरी पॅडवरून सासूने वाद घातला. सासूने पॅड बाहेर फेकण्यास सांगितले आणि तिच्यावर राग काढला. या वादात पती भावेशकुमारने आईची बाजू घेत अश्विनीला मारहाण केली आणि नोकरीवर निघून गेला. वादामुळे अस्वस्थ झालेल्या अश्विनीने आईला व्हिडिओ कॉल करून आपली व्यथा मांडली. “आई, मला सासू-पतीचा त्रास असह्य झाला आहे. मला जगायची इच्छा नाही,” असे सांगून फोन ठेवला. अश्विनीने सासूच्या त्रासाबद्दल आईला मेसेज आणि व्हॉइस नोट्स पाठवल्या. यानंतर सासू मंदिरात गेली असताना अश्विनीने गळफास घेतला.
दरम्यान भावेशकुमार घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून भावेशकुमारला अटक केली आहे.