शहरात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, नातेवाईकांचा तीव्र संताप

 

जळगाव समाचार | १२ सप्टेंबर २०२५

सासरच्या जाचाला कंटाळून एका २३ वर्षीय नवविवाहितेने जीवन संपविल्याची धक्कादायक घटना शहरात घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सुंदर मोती नगर येथील मयुरी ठोसरे या युवतीने दि. १० सप्टेंबर रोजी रात्री घरात कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. चार महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न झाल्यानंतर सतत आर्थिक मागण्या, छळ आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप मयुरीच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. सासरकडून होणाऱ्या त्रासामुळे तीन वेळा तडजोड करण्याचा प्रयत्न झाला, तरीही छळ थांबला नाही. अखेरीस मयुरीने टोकाचा निर्णय घेत जीवन संपवले.

मयुरीच्या वाढदिवसानिमित्त दि. ९ सप्टेंबर रोजी माहेरकडून पैसे देऊन तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर एका दिवसातच या दुर्दैवी घटनेने संपूर्ण कुटुंब हादरून गेले. घटनेनंतर माहेरच्या मंडळींनी तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालय गाठून पोलिसात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. “सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी ठाम भूमिका मयुरीच्या आई-वडिलांनी आणि भावाने घेतली आहे.

मयुरीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या मोठ्या दीराने पूर्वी घटस्फोट घेतल्यानंतरही तिच्याशी अश्लील वर्तन केले होते. बहिणीने वारंवार फोन करून मदतीची याचना केली, तरीही सुरुवातीला दुर्लक्ष झाले. आता मात्र “मोठ्या दीराच्या चुकीच्या वर्तनामुळे बहिणीचा छळ वाढला आणि शेवटी आत्महत्या करण्यास भाग पाडले,” असा संतप्त आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी मयताचे पती गणेश ठोसर, दीर गौरव ठोसर यांना अटक करण्यात आली आहे तर सासू लता ठोसर सासरे किशोर ठोसर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. राज्यात वैष्णवी हगवणे प्रकरण गाजत असताना अशा घटना अजूनही समोर येत असल्याने, आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत समाजातून संताप आणि आक्रोश व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here