जळगाव समाचार डेस्क। २८ ऑगस्ट २०२४
जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या निर्देशानुसार, जिल्ह्यातील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
जिल्हा नियोजन भवन येथे आज आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी विविध विभागांच्या चालू वर्षाच्या नियोजन निधीच्या खर्चाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्व यंत्रणांनी मंजूर कामांच्या 100 टक्के वर्क ऑर्डर 31 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच, सन 2024-25 अंतर्गत येणारी उर्वरित 100 टक्के कामे 5 सप्टेंबर 2024 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. राज्य शासकीय यंत्रणांनी 31 ऑगस्टपर्यंत 100 टक्के कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले, जेणेकरून आचारसंहितेपूर्वी कामांना कार्यारंभ आदेश देऊन सुरूवात करता येईल.
मंजूर कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनिक दिरंगाई आणि कामाच्या गुणवत्तेतील चालढकल खपवून घेतली जाणार नाही, असेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील ओडीआर आणि व्हीआर रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
तसेच, प्रलंबित असलेल्या व खासदार, आमदारांनी सुचविलेल्या नव्या कामांनाही तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देश त्यांनी दिले. महावितरण, वन विभाग, अंगणवाडी बांधकामे, कौशल्य विकास, परिवहन विभाग यांच्याकडील कामांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली.
“मुख्यमंत्री लाडकी बहिण” योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ज्या प्रकारे सर्व यंत्रणांनी सहकार्य केले, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि तीर्थदर्शन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठीही सर्व यंत्रणांनी वृद्धांना लाभ मिळावा, यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व विभागांच्या कामांचा आढावा घेऊन, कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या.