स्टीव्ह स्मिथची वनडे क्रिकेटमधून निवृत्ती; १५ वर्षांच्या कारकिर्दीला अलविदा…

जळगाव समाचार | ५ मार्च २०२५

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ याने आज (५ मार्च) वनडे क्रिकेटला अलविदा केला आहे. २०१० मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध लेग-स्पिनर ऑलराउंडर म्हणून पदार्पण केलेल्या स्मिथने पुढे आपल्या फलंदाजीच्या जोरावर जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.

स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून १७० वनडे सामने खेळले आणि ५८०० धावा केल्या. त्याची सरासरी ४३.२८, तर स्ट्राईक रेट ८७.१३ इतका आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने १२ शतकं आणि ३५ अर्धशतकं झळकावली असून, त्याचा सर्वोत्तम स्कोर १६४ धावा आहे. याशिवाय, त्याने गोलंदाजीत २८ विकेट्स घेतल्या आहेत.

स्टीव्ह स्मिथ कसोटी क्रिकेटमध्येही एक यशस्वी फलंदाज ठरला आहे. त्याने १०५ कसोटी सामने खेळले असून, त्यात ९४७४ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५८.०५ असून, त्याने ३२ शतकं आणि ३९ अर्धशतकं झळकावली आहेत. स्मिथचा सर्वोत्तम कसोटी स्कोर २३९ धावा आहे.

स्मिथने ६५ टी-२० सामने खेळले असून, त्यात ११०० धावा केल्या आहेत. त्याची सरासरी २५.५८, तर स्ट्राईक रेट १२५.२६ आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ४ अर्धशतकं झळकावली असून, सर्वोत्तम स्कोर ९० नाबाद आहे.

वादग्रस्त कारकीर्द – ‘सँडपेपरगेट’ प्रकरण

२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे स्मिथ वादात सापडला. ‘सँडपेपरगेट’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या घटनेमुळे त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. मात्र, त्यानंतर तो संघात पुनरागमन करून आपल्या फलंदाजीच्या कौशल्याने पुन्हा सर्वांचा विश्वास संपादन करू शकला.

स्मिथने वनडे क्रिकेटला अलविदा केला असला, तरी तो अजूनही कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळणार आहे. तसेच, जगभरातील फ्रँचायजी लीग क्रिकेटमध्ये त्याचा खेळ पाहायला मिळेल.

स्मिथने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारताविरुद्ध दुबई येथे आपला शेवटचा वनडे सामना खेळला. ऑस्ट्रेलियाच्या पराभवाने त्याच्या वनडे कारकीर्दीची सांगता झाली. स्टीव्ह स्मिथच्या वनडे निवृत्तीमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मोठी उणीव जाणवेल, मात्र कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमध्ये तो अजूनही क्रिकेटप्रेमींसाठी खेळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here